गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी... दिसेना
गजानन चेणगे
MSRTC STORY : कधीकाळी महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून मनामनात घर करून राहिलेल्या लालपरीच्या वैभवशाली परंपरेला दृष्ट लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी हे सूत्र घेऊन 'प्रवाशांच्या सेवेसाठी' गावागावात धाव घेणाऱ्या एसटीची सेवा आकसत चालल्यामुळे 'कोण होतीस तू, काय झालीस तू' म्हणण्याची वेळ सामान्य जनतेवर आली आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरुवातीच्या काळात बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अर्थात बीएसआरटीसी बॅनरखाली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत राज्यातील शहर आणि गावांना सेवा देणारी एसटी नंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) अधिपत्याखाली अधिक कार्यक्षमपणे सेवा देऊ लागली. १ जून १९४८ रोजी पुणे ते नगर मार्गावर पहिली एसटी बस धावल्याची नोंद आहे. पुढे या सेवेचा विस्तार वाढत गेला. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी या ध्येयाने प्रेरित होऊन एसटी 'प्रवाशांच्या सेवेसाठी' धावू लागली. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीने मनामनात स्थान मिळवले. पण गेल्या काही काळात एसटीच्या वैभवशाली परंपरेला दृष्ट लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एसटीवर अवलंबून असणाऱ्या सर्वसामान्य जनतेची कुचंबणा झाली आहे.
एसटीच्या ऱ्हासाला कारणीभूत कोण ?
कोरोनाच्या काळात प्रदीर्घकाळ सर्वदूर ठप्प झालेले जनजीवन आणि त्यातून सावरत असतानाच एसटीचा बरेच दिवस झालेला संप एसटीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. त्यातून बाहेर पडल्यापासून आजही राज्यातील एसटीची प्रवासी सेवा सुधारल्याचे दिसत नाही. एसटीच्या चाकाला गती मिळण्याऐवजी तिची अधोगती चालल्याचे पाहून सामान्य माणूस कळवळत आहे. त्यामुळे एसटीच्या भवितव्याबाबत राज्यकर्त्यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
आज प्रत्येक विभागात आणि आगारात एसटी बसची संख्या रोडावली आहे. कित्येक बसेस कालमर्यादेनुसार भंगारात गेल्या आहेत. काही त्या मार्गावर आहेत. पण त्या प्रमाणात नव्या बसेस एसटीच्या ताफ्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे भंगारात जायच्या योग्यतेच्या कित्येक बसेस तशाच रेटून वापरल्या जात आहेत. अनेक मार्गांवर आता जागोजागी अशा बसेस ब्रेकडाऊन झालेल्या पाहायला मिळत आहेत. त्याचा नाहक मनस्ताप प्रवाशांना सोसावा लागत आहे.
खाजगी वाहतूकदारांकडून लूट
बसेस कमी असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मार्गांवर एसटी दुर्मिळ झाली आहे. गावोगावच्या आठवडी बाजाराला सोडल्या जाणाऱ्या जादा गाड्या दिसेनाशा झाल्या आहेत. इतकेच नव्हे, तर शहरांना, तालुक्याच्या किंबहुना जिल्ह्यांच्या ठिकाणांना जोडणाऱ्या मार्गांवरही तासनतास एसटीसाठी लोकांना ताठकळावे लागत आहे. अशा ठिकाणी प्रवाशांच्या हतबलतेचा गैरफायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांकडून घेतला जात आहे. मनमानी भाडेवसुली सुरू आहे. त्याचा फटका गोरगरीब जनतेसह शाळा - कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही बसत आहे. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटीचा पास काढूनदेखील बसची संख्या कमी झाल्यामुळे ही सवलत कुचकामी ठरत आहे. शाळा कॉलेजच्या वेळा गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रसंगी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यात शाळा कॉलेजला सुट्टीच्या दिवशी ग्रामीण भागात अनेक गाड्यांना कात्री लावली जात असल्यामुळे अन्य प्रवाशांचे हाल होत आहेत.
पूर्वी एसटीच्या बाबतीत प्रवासी सेवेला सर्वोच्च प्राधान्य होते. आता 'अर्निंग'ला प्राधान्य आहे. ग्रामीण महाराष्ट्राला फाट्यावर मारून उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावरच एसटी धावत आहे. सध्या एसटी बसेसची संख्या कमी असल्यामुळे हा असा दात टोकरून पोट भरण्याचा धंदा सुरू आहे. त्यातही काही लांब पल्ल्याच्या मार्गावर साध्या बसऐवजी जाणीवपूर्वक शिवशाही, हिरकणी अशा महागड्या तिकिटांच्या बसेस चालवून अप्रत्यक्षपणे प्रवाशांची लूट केली जात आहे. या धंदेवाईकपणाचा प्रवाशांना अक्षरशः उबग आला आहे.
सुरक्षित प्रवासाच्या हमीचे काय ?
पूर्वी सुरक्षित प्रवासासाठी एसटीनेच प्रवास करण्याचे आवाहन महामंडळाकडून केले जायचे. त्यामुळे 'वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन' अशी जणू टॅगलाईनच होऊन गेली होती. मग आता प्रवाशांच्या सुरक्षिततेची, त्यांना चांगली सेवा देण्याची बांधिलकी कुठे गेली म्हणायची ? महामंडळाला प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजीच राहिली नाही म्हणायचे काय ?
एसटीच्या या अधोगतीचा फटका केवळ सर्वसामान्य जनतेलाच बसतो आहे असे नाही, तर एसटी कर्मचाऱ्यांचे भवितव्यही अंध:कारमय होण्याचा धोका आहे. हजारो रोजगार देण्याची क्षमता असलेली लालपरी टिकण्याची आवश्यकता आहे. मात्र सर्वसामान्य जनता यामध्ये भरडली जात असताना लोकप्रतिनिधी त्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. एसटी वाचवण्याची व वाढवण्याची इच्छाशक्ती राज्यकर्त्यांमध्ये दिसत नाही. आता गाव तिथे रस्ता आहे, पण रस्ता तिथे एसटी धावत नाही ही सर्वसामान्यांची खंत आहे. त्यामुळे एसटीला 'कोण होतीस तू, काय झालीस तू' म्हणण्याची वेळ सामान्य जनतेवर आली आहे.
एसटीच्या बाबतीत जनतेच्या अपेक्षा
* एसटीचे खाजगीकरण होऊ नये. ते जनतेच्या व एसटी कर्मचाऱ्यांच्याही हिताचे राहणार नाही.
* एसटीची सेवा मूळ उद्दिष्टांपासून भरकटू नये.
* महामंडळाकडून नवीन गाड्यांची खरेदी व्हावी.
* ग्रामीण व शहरी भागातही फेऱ्या वाढवाव्यात.
* प्रमुख मार्गांवर साध्या बसेसही ठेवाव्यात.
* शिवनेरी, शिवशाही, हिरकणीसारख्या जास्त तिकिटांच्या गाड्या सरसकट माथी मारू नयेत.
MSRTC NEWS, Road Transport minister of Maharashtra, S. T. Bus
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या