कोणतेही धागेदोरे नसताना आरोपीस पकडले; एलसीबीची कामगिरी
Satara Crime News : खंडाळा तालुक्यातील लोणंदमध्ये १५ जुलै रोजी एका अनोळखी इसमाचा फरशी व सिमेंट काँक्रिटचा ब्लॉक डोक्यात घालून निर्घृणपणे खून झाला होता. खून झालेल्या व्यक्तीचे नाव - गाव माहीत नसताना आणि कोणतेही धागेदोरे नसताना या गुन्ह्याची उकल करून आरोपीला जेरबंद करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
मनोज तिवारी (वय २५, मूळ रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश, सध्या रा. कुर्ला कलिना एअरपोर्टजवळ, मुंबई) असे याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला फलटण येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. खून झालेली व्यक्ती व आरोपी हे दोघे मुंबई येथे एका केटरर्सकडे कामास होते, त्याठिकाणी सुमारे ६ महिन्यांपूर्वी दोघांच्यामध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरुन वाद झाले होते. त्या वादातूनच आरोपीने हा खून केला असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. आरोपीस पुढील कारवाईकामी लोणंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तपासासाठी एलसीबीचे विशेष पथक
दि. १५ जुलै रोजी लोणंद रेल्वे स्टेशनच्या गार्डनमध्ये एका ३० ते ३५ वयाच्या अनोळखी इसमास अज्ञात आरोपीने फरशी व सिमेंट काँक्रिटचा ब्लॉक डोक्यात मारुन त्याचा खून केल्याबाबतची तक्रार रेल्वे प्रोटेक्शन फोर्स विभागाचे अंमलदार विजय किशोर गार्डे (रा. रेल्वे कॉलनी, लोणंद) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे देवकर यांच्या अधिपत्त्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे एक विशेष पथक तयार करुन तपासकामी लोणंद पोलीस ठाण्यास पाठवले होते.
४ दिवस अहोरात्र कसोशीने तपास
या पथकाने घटनास्थळास भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली. तांत्रिक पध्दत, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार तसेच साखळी तपास पध्दतीचा अवलंब करुन या पथकाने खून प्रकरणाचा लोणंद व फलटण परिसरात ४ दिवस अहोरात्र कसोशीने तपास केला. त्यात हा गुन्हा परराज्यातील इसमाने केला असल्याचे निष्पन्न झाले. खून झालेल्या इसमाची अद्याप ओळख पटली नाही आरोपी व मयत यांचा कोणत्याही प्रकारे राहण्याचा अगर वावरण्याचा ठावठिकाणा नव्हता. तसेच मयताच्या जवळ ओळख पटण्याचे कोणतेही दस्तऐवज मिळून न आल्याने हा खूनाचा गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रनेसमोर होते.
या कारवाईमध्ये विश्वास शिंगाडे, अतिष घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्वेâ, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, स्वप्निल कुंभार, प्रविण कांबळे, अरुण पाटील, ओंकार यादव, मोहन पवार तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार सचिन फाळके व ऋषीकेश खरात यांनी सहभाग घेतला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या