'रयत'चे निवृत्त कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते अनिल जेधे यांचे निधन
गजानन चेणगे
Satara News : रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त सेवक, मसूर येथील जटाशंकर महादेव मंदिराचे विश्वस्त व वीरशैव लिंगायत समाजाचे कार्यकर्ते अनिल जगन्नाथ जेधे यांचे शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गुजरातमधील पालनपूर (जि. बनासकांठा) येथे तीर्थयात्रेदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
एका यात्रा कंपनीच्या बसने ते दि. ७ रोजी पत्नीसमवेत गिरनार, वैष्णोदेवी, अमरनाथ आदी ठिकाणी तीर्थयात्रेसाठी गेले होते. गिरनार करून पुढच्या प्रवासाला जात असताना त्यांना काल अचानकपणे अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे गुजरात राज्यातील उत्तर भागात असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
शुक्रवारी रात्रीच अघटिताची कुणकुण
अनिल जेधे यांच्याबाबतीत काहीतरी अघटित घडले असल्याची कुणकुण शुक्रवारी रात्रीच मसूर गावात लागली होती. मात्र नक्की काय घडले आहे याविषयी काहीच समजत नव्हते. त्यामुळे जेधे यांच्या मित्र परिवारासह संपूर्ण गावात अस्वस्थता जाणवत होती. लोक एकमेकांकडे चौकशी करत होते. मात्र अधिकृतरीत्या काहीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकली गेली नाही.
आज सकाळी यासंबंधीच्या पोस्ट सोशल मीडियावर येऊ लागल्यानंतर अनिल जेधे यांना श्रद्धांजलीचे मेसेज सुरू झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मसूरकरांना धक्का बसला असून गावावर शोककळा पसरली आहे. प्रत्येकाचे मन हेलावले असून सोशल मीडियावर भावभावनांचे प्रतिबिंब उमटत आहे.
विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था
जवळपास राजस्थानला लागून असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातून पार्थिव आणले जात असून त्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. खूप लांबचा पल्ला असल्यामुळे शनिवारी रात्री उशिरा पार्थिव मसूरला पोहोचणार आहे. त्यानंतर मसूर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहेत.
निर्मळ मनाचे व्यक्तिमत्व हरपले
अनिल जेधे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कुसूर, उंब्रज तसेच अतीत येथील शाळांमध्ये प्रदीर्घ सेवा बजावली होती. सहा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते समाजकार्यात सक्रिय झाले होते. गुंफण अकादमीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उपक्रमात ते उत्साहाने सहभागी होत असत. सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते म्हणून गावात त्यांची ओळख होती. सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागणारे, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे, माणसे जोडणारे, लहान थोरांना आदराने वागवणारे एक निर्मळ मनाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याविषयी गावात अत्यंत आदराची भावना होती. त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या जात असून प्रत्येकजण जेथे सरांच्या अकाली एक्झिटमुळे गहिवरला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या