पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान; मधुकर भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
Satara News : महाराष्ट्राला प्रगल्भ विचारांचा वारसा असून राज्यातील माध्यमांनी सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांची पत्रकारिता करावी. आगामी काळात माध्यमांमध्ये आमुलाग्र बदल होणार आहेत. ते बदल स्वीकारून नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी पत्रकारांनी सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड येथील इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६८ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
सचिन जवळकोटे, दीपक प्रभावळकर, सोनाली शिंदे यांचाही सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मान
यावेळी ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवनगौरव पुरस्काराने तसेच दैनिक सामनाचे सातारा जिल्हा प्रतिनिधी गजानन चेणगे, लोकमत सोलापूरचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, तरुण भारतचे सातारा आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर, साम टीव्हीच्या सोनाली शिंदे यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
यावेळी प्रसिद्ध व्याख्याते व शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, टेंभू गावच्या लोकनियुक्त सरपंच रुपाली भोईटे, माजी सरपंच युवराज भोईटे, इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त प्रमोद तोडकर, संदीप चेणगे, अशोक मोहने, माणिक डोंगरे, नितीन ढापरे, विकास भोसले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पत्रकारांचे लेखन स्वातंत्र्यही धोक्यात !
आज लोकशाही धोक्यात आली असून पत्रकारांचे लेखन स्वातंत्र्यही धोक्यात आहे. सरकारच्या चुकीच्या गोष्टींविरोधात लिहिणारे किंवा बोलणारे पत्रकार प्रवाहाच्या बाहेर फेकले जात आहेत. आजही काही पत्रकार सोशल मीडियावरून, यूट्यूब चॅनलवरून आपली भूमिका मांडत असले तरी तोही आवाज सहजपणे दाबला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करत, लोकशाही वाचवण्यासाठी आमच्याबरोबरच पत्रकारांचीही काही जबाबदारी आहे असे विचार पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रसंगी व्यक्त केले. टेंभू येथे आगरकरांच्या स्मारकासाठी प्रयत्नशील राहणार आहे अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
आगरकरांचे मोलाचे योगदान
यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे - पाटील म्हणाले, समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी राहण्याची गरज असून हे काम इंद्रधनु विचारमंच फाउंडेशन करीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेला लढा हा देशाला प्रेरणादायी ठरला आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आगरकरांचे मोलाचे योगदान असून त्यांच्यासारखे महापुरुष आपल्या सातारा जिल्ह्याच्या मातीत जन्माला आले याचा आम्हा सर्वांना नक्कीच गर्व आहे.
पत्रकारांनी आगरकरांप्रमाणे पत्रकारिता करावी
यावेळी जीवनगौरव पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ संपादक मधुकर भावे म्हणाले, सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या नावाने पुरस्कार स्वीकारावा एवढी आमच्या पत्रकारांची उंची नक्कीच नाही. महाराष्ट्राच्या क्रांतीचे प्रणेते म्हणून आगरकरांचा महत्त्वाचा वाटा आहे. पत्रकारांची जबाबदारी महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची असून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करण्याची नितांत गरज आहे. आगरकरांच्या विचाराप्रमाणे पत्रकारांनी प्रामाणिक व निष्ठेने पत्रकारिता करावी.
यावेळी रामकृष्ण वेताळ यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कराड तालुक्यातील विविध दैनिकांचे कार्यालय प्रमुख, उपसंपादक, पत्रकार, साहित्यिक, विद्यार्थी - विद्यार्थिनी व नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. डॉ. कोमल कुंदप यांनी केले, तर आभार प्रा. रमेश पोळ आणि मानले.
‘इंद्रधनु’चे मान्यवरांनी केले कौतुक
सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचे मूळ गाव कराड तालुक्यातील टेंभू असून राज्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील अनेकांना याबाबत माहीत नाही. मात्र इंद्रधनु विचारमंच फाउंडेशन या संस्थेने गेल्या चार वर्षांपासून आगरकरांचे विचार राज्यभर रुजविण्यास सुरुवात केली आहे. तसेच राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारामुळे गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या महान व्यक्तीचे कार्य समाजापुढे येत असल्याबाबत ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नितीन बानुगडे - पाटील व इतर मान्यवरांनी कौतुक केले.
मधुकर भावे यांनी मांडली पत्रकारितेची व्यथा
गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांना या समारंभात सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर भावे यांनी महाराष्ट्रातील माध्यमांच्या सुरू असलेल्या चुकीच्या धोरणावर जोरदार प्रहार केला. माध्यमाने फक्त राजकीय लोकांच्या बातम्या न लावता सर्वसामान्य पीडित व शेतकऱ्यांना देखील न्याय दिला पाहिजे. याबाबत रोखठोक भूमिका मांडत यापुढील काळात माध्यमांनीदेखील भान राखून वागले पाहिजे असे खडेबोल सुनावले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या