Satara Story : विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका डॉ. रोशनआरा शेख


असंख्य विद्यार्थी घडवणाऱ्या शेख मॅडम आज होणार सेवानिवृत्त

सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील उपप्राचार्या, इंग्रजी विभाग प्रमुख, प्रेरणादायी - विद्यार्थीप्रिय उत्साही प्राध्यापिका डॉ. रोशनआरा शेख या शुक्रवार दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त...

- प्रा. डॉ. सुभाष वाघमारे 

प्रा. डॉ. रोशनआरा शेख या श्रीगोंदा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबूमिया बँडवाले यांच्या नात होत. आजोबा सत्यशोधक असल्याने  लहानपणापासूनच पुरोगामी व सत्यशोधक  विचारांचे संस्कार त्यांना मिळाले. शुद्ध वर्तन, आजोबा व वडील हे कलाकार तसेच संगीत विशारद असल्यामुळे संगीताचा वारसाही त्यांना लहानपणी मिळाला. आजी मुख्याध्यापिका होत्या. त्यामुळे शाळेतदेखील हुशारी आली. क्षमता संपादन केल्यामुळे त्यांना इयत्ता दुसरीमधून  चौथीच्या वर्गात बसविण्यात आले. हायस्कूलच्या शिक्षणात देखील नेहमी पुढे. बारावी विज्ञान झाल्यानंतर त्यांनी अहमदनगर कॉलेज, अहमदनगर या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ५ वर्षे वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. बी. ए. व एम. ए.  (इंग्रजी) परीक्षेत त्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले. त्यांनी प्राध्यापक व्हावे अशी त्यांच्या आई राबिया सय्यद यांची इच्छा होती. त्यांना घडवण्याचे संपूर्ण श्रेय त्या आपल्या आईला देतात. 

२१ व्या वर्षी प्राध्यापक म्हणून रुजू 

१९८६ साली वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्या प्राध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या शिरवळ येथील विनाअनुदानित कला व वाणिज्य महाविद्यालयात रुजू झाल्या. दरम्यान, पीएच.डी पदवी पुणे विद्यापीठातून संपादन केली. १९९४ मध्ये त्यांची कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेज येथे बदली झाली. तिथेही गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केले. 

सन २०१० मध्ये सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात देखील इंग्रजी विभाग प्रमुख व IQAC कॉर्डीनेटर म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या.

पुरुषोत्तम करंडक जिंकला 

जून २०१८ पासून त्यांची बदली रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज या ठिकाणी झाली. पहिल्याच वर्षी स्टाफ ॲकॅडमी विभाग प्रमुख म्हणून काम करून वर्षभरात १६ व्याख्यानांचे आयोजन केले. तसेच याच वर्षीपासून सांस्कृतिक विभाग प्रमुख ही जबाबदारी तर घेतलीच, शिवाय नॅक क्रायटेरिया क्रमांक २ ची महत्वाची जबाबदारी ३ वर्षे पार पाडली. तसेच २०२० पासून त्यांनी उपप्राचार्य म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. त्या सांस्कृतिक विभाग प्रमुख झाल्यानंतर, शिवाजी विद्यापीठाच्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे यजमानपद छत्रपती शिवाजी कॉलेजने घेतले. त्याच्या त्या समन्वयक होत्या. या युवा महोत्सवात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पारितोषिके छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवली. एवढेच नव्हे तर पुरुषोत्तम करंडक नाट्य स्पर्धेतही छत्रपती शिवाजी कोलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे  पारितोषिक मिळवले. 

कामाचे उत्तम नियोजन,  नीटनेटकेपणा व तळमळीने काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले. इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी ५ वर्षे उल्लेखनीय काम केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी आपल्या विभागात केले. इंग्रजी विषयातील अनेक विषयांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून त्यांचे तीसपेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुदानातून एक संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केला. या काळात विभागात रिफ्रेशर कोर्स घेण्याचा निर्णय आणि आयोजन, दोन आंतरराष्ट्रीय  चर्चासत्रांचे आयोजन त्यांनी केले.

सामाजिक कामातही सहभाग

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभूत्व असून या तीन्ही भाषेत त्या उत्तम निवेदन करतात. तसेच सामाजिक कामातही त्यांचा सहभाग आहे. ‘महिला सक्षमीकरण' या विषयावर अनेक ठिकाणी त्या मार्गदर्शन करतात. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘बचत गट काळाची गरज' या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

त्यांनी आतापर्यंत ४ राज्यस्तरीय व ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत. ‘ज्ञान दायिनी गौरव सन्मान’, ‘राष्ट्रीय शिक्षक भूषण पुरस्कार’, आदिशक्ती साताऱ्याची महिला सन्मान’, ‘कॉमनवेल्थ एक्सलंस अवार्ड’ ,‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक रत्न पुरस्कार’, राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवारत्न सन्मान’, ‘उत्तम निवेदिका पुरस्कार’ इत्यादी पुरस्कार त्यांनी मिळविले आहेत. त्यांचे पती सुजित शेख व चिरंजीव रोहीत शेख हेही पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांच्या सर्व कामात त्यांचाही सपोर्ट आहे. 

जबाबदारीच्या पदावर काम

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या त्या नियामक मंडळ सदस्य, इंग्लिश अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष, इंग्लिश संशोधन सल्लागार समिती प्रमुख, विद्यार्थी विकास मंडळ सदस्य, विविध महाविद्यालयांच्या विद्यापरिषद सदस्य व छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थिनी वसतीगृहाच्या प्रमुख व विद्यापीठाच्या पीएच.डी. पदवीसाठी इंग्रजी विषयाच्या मार्गदर्शक अशा जबाबदारीच्या पदावर त्यांनी काम केले. 

डॉ. शेख मॅडम यांची एकूण ३९ वर्ष २ महिने प्राध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमधून सेवा केली. आज या प्रदीर्घ सेवेतून त्या निवृत्त होत आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या सर्व स्टाफकडून व विद्यार्थ्यांच्याकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पुढाकार 

आपल्यातील कलागुणांनी प्रा. डॉ. रोशनआरा शेख यांनी विद्यार्थ्यांना संघटीत करून बहुविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणले, योग्य मार्गदर्शन करीत त्यांनी युवा महोत्सवात कॉलेजला अनेक पारितोषिके मिळवून दिली, आणि त्यांच्याच कार्यकाळात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विद्यार्थ्यांनी खेचून आणले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या