जिल्ह्यात जो ट्रॅक्टर रस्त्यावर दिसेल तो कूपरचा असला पाहिजे - ना. शिवेंद्रराजे भोसले
गजानन चेणगे
Satara News : साताऱ्याला औद्योगिक चेहरा देणाऱ्या आणि जागतिक पातळीवर इंजिन, इंजिनचे सुट्टे भाग आणि जनरेटर्सचे उत्पादक असलेल्या कूपर कॉर्पोरेशनच्या अत्याधुनिक ट्रॅक्टर प्लांटचे उद्घाटन शनिवारी दिमाखदार सोहळ्याने झाले.
जिल्ह्यात जो ट्रॅक्टर रस्त्यावर दिसेल तो कूपरचा असला पाहिजे अशी भूमिका आपण घेतल्यास येथील इंडस्ट्री वाढल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
पहिल्या ग्राहकांना ट्रॅक्टरच्या चाव्या
ना. शिवेंद्रराजे भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सातारा औद्योगिक वसाहतीत 'कूपर ट्रॅक्टर' प्लांटचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात कूपर ट्रॅक्टर एनडीसी सिरीज हा कंपनीचा पहिला ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी बुर्गिस बल्सारा (मुंबई), दिलीपराव नलवडे (सातारा), सुनील जमदाडे (वाई) तसेच ज्ञानेश्वर बिरदार (उदगीर, जि. लातूर) या पहिल्या मान्यवर ग्राहकांना ट्रॅक्टरच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.
याप्रसंगी कूपर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फरोख कूपर, उद्योग समूहाच्या संचालिका महारोख कूपर, ॲड. मनीषा कूपर, रिकार्डो यूकेचे ग्लोबल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डायरेक्टर क्लाइव्ह बॅगनॉल, मॅग्ना स्टेयर कंपनीचे इंडिया हेड नंदू रांगणेकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, कूपर समूहाचे संचालक बेहराम आर्देशीर, सूर्याजी स्वामी, अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारच्या मातीवरील प्रेम
याप्रसंगी शिवेंद्रराजे यांनी उद्योगपती फरोख कूपर यांच्या कार्याची प्रशंसा केली. फरोख साहेब स्पष्टपणे सांगतात, की बाहेरच्यांनी मला कितीही आणि कुठेही बोलवू दे, पण मी सातारच्या बाहेर जाणार नाही. जो काही नवीन कारखाना उभा करणार, तो साताऱ्यातच उभा करणार. येथील मातीबद्दल, या शहराबद्दल, जिल्ह्याबद्दल त्यांचे हे जे प्रेम आहे त्याचा तुम्हा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. त्यामुळे बी कूपर बाय कूपर ही भूमिका जिल्हावासीयांनी घेतली पाहिजे असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
शेतीच्या यांत्रिकीकरणाची सुरुवात
सातारा जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा व स्वाभिमानाचा दिवस आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणाची सुरुवात साताऱ्यातून खऱ्या अर्थाने कूपर कुटुंबाने केली असून जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने ट्रॅक्टर घेताना पहिले प्राधान्य कूपरला दिले पाहिजे. मीदेखील ट्रॅक्टर बुक करून याची सुरुवात करतो असे उद्गार ना. महेश शिंदे यांनी यावेळी काढले. औद्योगिक वसाहती या आपल्यासाठी मंदिरे आहेत. ती जपली, वाढवली पाहिजेत. उद्योग जगताला ताकद देण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
आई व पत्नी यांची भक्कम साथ
उद्योजक फरोख कूपर यांनी आपल्या खास बहारदार शैलीत उद्योग क्षेत्रातील आपल्या वाटचालीचा मागोवा घेतला. मी ट्रॅक्टर बनवणार हे कधी माझ्या स्वप्नातही नव्हते. परंतु आज ते सत्यात उतरते आहे. वास्तविक आपण कृषी पदवीधर. पण काही विशिष्ट परिस्थितीत माझ्या मातोश्रींनी तुला कारखाना चालवावा लागेल असे सांगितल्याने ही जबाबदारी घेतली. सुरुवातीला काम मिळवण्यासाठी अमेरिकेत गेलो होतो. त्यावेळी छोटीशी ऑर्डर मिळाली होती. आज कूपर उद्योग ७५ हजार टन माल परदेशात पाठवतो. पुढे इंजिन निर्मितीकडे वळलो. रिकार्डो गेलो. आम्ही जे इंजिन बनवतो ते आर्मी कडे जास्त जाते. आता ट्रॅक्टर आणत आहोत असे ते म्हणाले. या सगळ्या वाटचालीत आई व पत्नी यांची भक्कम साथ मिळाल्याचे सांगत त्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी रिकार्डो यूकेचे ग्लोबल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डायरेक्टर क्लाइव्ह बॅगनॉल, मॅग्ना स्टेयर कंपनीचे इंडिया हेड नंदू रांगणेकर यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा भिसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नीलाक्षी ताडे यांनी केले.
आईच्या मैत्रिणीनं कॉम्प्लिमेंट्स दिल्यानं बरं वाटलं !
राजघराण्याशी कूपर घराण्याच्या असलेल्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या संबंधाला उजाळा देताना ना. शिवेंद्रराजे भावूक झाले. मला लहानपणापासून फरोख अंकल आणि महारोख आंटी म्हणून ते माहिती आहेत. ते मला जन्मापासून पाहत आले आहेत. त्यामुळे फरोख कूपर यांना साहेब म्हणणं थोडं अवघड होतंय. महारुख आंटी यांनी आज मला बऱ्याच दिवसांनी पाहिलं. 'सध्या जरा केसं वाढवलेत... चांगला दिसतोय' असं त्या मला म्हणाल्या. तेव्हा म्हटलं, 'आता आई तर नाही, पण आईच्या मैत्रिणीनं कॉम्प्लिमेंट्स दिल्यानं बरं वाटलं' अशा शब्दात शिवेंद्रराजे यांनी हा जिव्हाळा जागवला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
Cooper Corporation, Farokh Cooper, Cooper Tractor plant in Satara
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या