Satara News : वाघनखे साताऱ्यातून नागपूरला रवाना


राजधानीत सात महिन्यात पाच लाख शिवभक्तांनी घेतले दर्शन 

गजानन चेणगे 

Satara News : लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून करारावर आणलेली व सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवलेली शिवकालीन वाघनखे आज सात महिन्यांनी कडेकोट व्यवस्थेत नागपूरला रवाना झाली. सातारला जवळपास पाच लाख शिवभक्तांनी या वाघनखांचे दर्शन घेतले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य नष्ट करण्याचा विडा उचलून विजापुरातून चालून आलेल्या अफझलखान या बलाढ्य सरदाराचा कोथळा शिवरायांनी वाघनखांनी काढला होता. १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी सातारा जिल्ह्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी हा अलौकिक पराक्रम घडवला होता. शिवरायांचे साहस आणि शौर्य याची साक्ष म्हणून पाहिल्या जाणाऱ्या वाघनखाचे महत्त्व आणि स्थान शिवकाळात आणि त्यानंतरही अपरंपार असे होते. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये वाघनखांविषयी आजही प्रचंड कुतूहल आणि आस्था पाहायला मिळते.

जुलैपासून होती सातारच्या संग्रहालयात

शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे झाल्याचे औचित्य साधून लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली शिवकालीन वाघनखे करारावर १९ जुलै २०२४ रोजी साताऱ्यात आणली होती. तेव्हापासून ३१ जानेवारी २०२५ अखेर सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ती प्रदर्शित केली होती. या वाघनखांविषयी असलेल्या प्रचंड उत्सुकतेतून सात महिन्यांच्या काळात जवळपास पाच लाख शिवप्रेमींनी या वाघनखांचे दर्शन घेतले. शालेय विद्यार्थ्यांना ही संधी मोफत देण्यात आली होती. त्यामुळे नेहमीच सातारा जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात शाळांच्या सहली या ठिकाणी येत होत्या. या काळात या संग्रहालयाला सुमारे दहा लाखांचा महसूल प्राप्त झाल्याचे या विभागातर्फे सांगण्यात आले.


कडेकोट व्यवस्थेत हस्तांतरण

पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार या शिवकालीन वाघनखांच्या सातारा मुक्कामाचा कालावधी संपल्याने आज सकाळी नऊच्या सुमारास पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या वाघनखांना नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात हलवण्यात आले. ब्रिटिश अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाच्या विशेष पथकाच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक हस्तांतरण सोहळा पार पडला. वाघनखांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

नियोजित वेळापत्रकानुसार साताऱ्यानंतर आता नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत, त्यानंतर ३ ऑक्टोबर ते ३ मे पर्यंत कोल्हापूर येथील संग्रहालयात व त्यानंतर मुंबई येथे ही शिवकालीन वाघनखे शिवभक्तांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj, Historical waghnakh, Victoria and Albert museum, London, Nagpur Central museum

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या