सातारकरांची गैरसोय करून जागा व्यावसायिकाच्या घशात
Satara News : सातारा शहरात आधीच सार्वजनिक स्वच्छता गृहांची कमतरता असताना बसस्थानकानजीक बाजार समितीच्या आवारातील स्वच्छतागृहाचा बाजार उठवून ती जागा व्यावसायिकाच्या घशात घालण्याची उठाठेव सध्या सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात गैरसोय आली आहे.
सातारा शहरात सार्वजनिक स्वच्छता गृहांची कमतरता असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही महिला वर्गाची कुचंबना खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरातील काही स्वच्छतागृहे त्या परिसरातील व्यावसायिकांचे हित जपण्यासाठी रातोरात भुईसपाट झाली असून अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्थाही केविलवाणी आहे. कमालीच्या अस्वच्छतेमुळे आणि दुर्गंधीमुळे त्या ठिकाणी जाण्यास लोक धजत नाहीत. काहींना नाईलाजाने जाण्याशिवाय पर्याय नसतो.
त्या 'पवित्र' जागी कदाचित लोक
खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणार ?
सातारा बसस्थानकानजीक बाजार समितीच्या आवारात मुख्य रस्त्यालगत सुलभ शौचालय व स्वच्छतागृह बांधले होते. या आवारात दररोज सकाळी भरणाऱ्या मंडईस खेड्यापाड्यातील शेकडो शेतकरी भाजीपाला विक्रीस घेऊन येत असतात. त्यात महिलाही मोठ्या संख्येने असतात. या ठिकाणी शेतकऱ्यांकडील भाजीपाला घेण्यासाठी शहरवासीयांची प्रचंड झुंबड असते. या हजारो नागरिकांसाठी हे स्वच्छतागृह उपयोगी पडत होते. मात्र यातील स्वच्छतागृह तोडण्यात आले असून त्या जागी सध्या गाळे बांधण्याचे काम सुरू आहे. स्वच्छतागृहामुळे 'पवित्र' झालेल्या या जागेवर बसून सातारकर काही दिवसात कदाचित वडापावचा आस्वाद घेतील असे दिसते.
टपऱ्यांच्या आडोशाने 'कारभार'
वास्तविक ही जागा लहान असली तरी आत हातभर, बाहेर हातभर पसरून छोटे छोटे दोन गाळे येथे केले जात आहेत. मुख्य रस्त्याच्या पदपथावर व्यवसायिकांच्या टपऱ्या आधीपासूनच ठाण मांडून बसल्या आहेत. त्यांच्या आडोशाने स्वच्छतागृह पाडण्याचा व गाळे बांधण्याचा हा सगळा कारभार केला गेल्याने तो लोकांच्या फारसा डोळ्यावर आला नाही. गेल्या दहा-बारा दिवसांपासून हा उद्योग सुरू असून तेव्हापासूनच शेतकरी वर्गाची व भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या सातारकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांच्यात संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करत असल्याचे सांगणाऱ्या बाजार समितीने यातून कोणाचे हित साधले असे विचारले जात आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या