Satara Story : 'सूर्यफूल'कार जयवंत गुजर


स्तंभलेखन समृद्ध करणारे पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व

समाजातील आणि राजकारणातील व्यंगावर अचूक बोट ठेवून ढोंगावर फटका कसा मारावा हे पाहायचे असेल तर सातारा येथील ऋषीतुल्य पत्रकार जयवंत गुजर तथा दादा यांच्या पत्रकारितेचा अभ्यास नव्या पिढीतील पत्रकारांनी जरूर करावा. बुधवार दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी ते वयाची ९२ वर्षे पूर्ण करून ९३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त...

- गजानन चेणगे 

लेखणी ही तलवारीहून सामर्थ्यवान असते. म्हटलं तर ती दुधारी शस्त्र असते. कुणाच्या हाती आहे यावरून त्याचे परिणाम ठरत असतात. तलवार तुम्हाला युद्धात विजय मिळवून देईल, पण हृदय जिंकण्याची ताकद तलवारीत नव्हे, तर लेखणीत असते. त्यामुळे ती जबाबदार माणसाच्या हाती जास्त शोभिवंत दिसते. 

लेखणीच्या अनुषंगाने आणि खास करून वृत्तपत्राच्या सामर्थ्याविषयी अकबर इलाहाबादी यांचा एक शेर अजरामर आहे, खींचो न कमानो को, न तलवार निकालो, जब तोप हो मुकाबिल तो अखबार निकालो.

सातारा येथील ऋषीतुल्य पत्रकार जयवंत गुजर तथा दादा यांच्या पत्रकारितेतून हेच लेखणीचे सामर्थ्य दशकानुदशके प्रतिबिंबित होत राहिले. समाजातील आणि राजकारणातील व्यंगावर अचूक बोट ठेवून ढोंगावर फटका कसा मारावा हे पाहायचे असेल तर त्यांच्या पत्रकारितेचा अभ्यास नव्या पिढीतील पत्रकारांनी जरूर करावा. 

दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सहवास

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे यांच्यासह जुन्या जमान्यातील नामवंत पत्रकार यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभलेल्या जयवंत गुजर यांनी कर्मवीरांच्या इच्छेखातर पत्रकारितेचा वसा घेतला. सुरुवातीला कथा - कविता यात रमणारी त्यांची लेखणी स्तंभ लेखनाच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारणात चौफेर फटकेबाजी करू लागली. नर्मविनोदी आणि उपहासात्मक शैलीत राजकारण्यांना चिमटे काढणे हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य. सत्यशोधकी विचारधारेचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्या लेखनाला एक वेगळीच धार पाहायला मिळते. सत्याशी प्रतारणा त्यांनी कधीच केली नाही आणि ते मांडताना कोणाची भीडभाडही ठेवली नाही. खरे तर त्या काळात ते मोठे धाडसाचे काम होते. परंतु सत्याचा आग्रह हेच त्यांचे नैतिकदृष्ट्या बलस्थान राहिले. यशवंतराव चव्हाण यांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. ते त्यांना नेहमीच सबुरीने घेण्याचा प्रेमाचा सल्ला देत असत.

महाराष्ट्राच्या विविध भागातील, म्हणजे दादांच्याच शब्दात सांगायचे तर चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी प्रचंड प्रमाणात प्रदीर्घकाळ स्तंभलेखन केले. दैनिक ऐक्यमधून सलग ३५ वर्षे त्यांनी चालवलेले 'सूर्यफूल' हे सदर प्रचंड लोकप्रिय झाले. इतकेच नव्हे तर एका वृत्तपत्रात दररोज इतकी वर्षे एखादे सदर चालवण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला. सातत्याने इतकी वर्षे लिहीत राहणे वाटते तितके सोपे नाही. हे लेखनही अत्यंत सदाबहार असेच राहिले आहे. 

यशवंतरावजींकडून शाबासकीची थाप

दररोज काहीतरी नवे देण्याचा आणि सदाबहार लेखनातून वाचक खिळवून ठेवण्याचा एक आगळावेगळा वस्तूपाठ सूर्यफूलने घालून दिला. या सूर्यफूल सदराची जन्मकथाही रंजक अशीच आहे.

दैनिक ऐक्य हे सातारा जिल्ह्याचे मुख्य दैनिक. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात तर जिल्हावासियांचे बातम्यांसाठीचे हे प्रभावी माध्यम होते. त्यामध्ये स्तंभलेखन सुरू करण्याविषयी यशवंतराव चव्हाण यांनी जयवंत गुजर यांना सांगितले. तसे ठरलेही. त्याप्रमाणे दादांनी दैनिक ऐक्यमध्ये सूर्यफूल नावाचा पहिला स्तंभलेख लिहिला. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या यशवंतराव चव्हाण हा एकमेव सूर्य, बाकी सर्व सूर्यफुले अशा आशयाचा तो लेख होता. त्याची सर्वत्र खूपच चर्चा झाली. खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी मिश्किलपणे, माझ्यावरच उपवास सोडलास का ? असा सवाल करत या सदराचे नाव 'सूर्यफूल' असे सांगून टाकले. आणि हे सूर्यफूल अनेक वर्षे वाचकांना भुरळ घालत राहिले. 

सूर्यफुलाचे उमलणे सुरूच

आज हा सगळा लेखनप्रपंच करण्याचा उद्देश हा, जयवंत गुजर या पत्रकारितेतील खऱ्या अर्थाने 'दादा' असणाऱ्या दादांचा आज वाढदिवस. वयाची ९२ वर्षे पूर्ण करून आज त्यांनी ९३ व्या वर्षात पदार्पण केले. सांगून विश्वास बसणार नाही, पण आजही त्यांचे लेखन आणि वाचन अखंडपणे सुरू आहे. ऐक्यमधून प्रासंगिक स्वरूपात ते लिहीत असतातच, पण कोकणातील सागर या दैनिकात आजही 'सूर्यफूल' सुरू आहे. त्याचे उमलणे सुरूच आहे. याशिवाय 'सत्यान्वेशी' नावाचा स्तंभही ते नियमित लिहीत आहेत. आजही स्मरणशक्ती उत्तम आहे आणि हात थरथरत नाही असे ते सांगतात तेव्हा खरोखरच त्यांचा हेवा वाटतो. त्यांच्या कन्या मेधाताई या त्यांची खूप चांगल्या पद्धतीने सेवा करतात, काळजी घेतात.

मान्यवरांकडून अभिष्टचिंतन

बुधवारी वाढदिवसाच्या निमित्ताने विसावा नाक्याजवळील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार केशव चव्हाण हेदेखील होते. सकाळपासून डॉ. सुरेश शिंदे, कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेचे चेअरमन कॅप्टन उदाजीराव निकम, सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, सातारा हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत देशमुख, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव शिंदे, विजय मांडके, गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्रा. धनंजय देवी यांच्यासह सामाजिक, राजकीय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन दीर्घायुष्य चिंतिले. 

दादांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, त्यांनी शतायुषी व्हावे हीच यानिमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या