मार्गात आघातांची मालिका; तरीही न खचता यशाचा पाठलाग
Sangola News : घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही, कोणत्याही भौतिक सुविधाही उपलब्ध नाहीत. जगण्यासाठी कुटुंबाची धडपड चालू असतानाच एकामागून एक कुटुंबातील चार सदस्यांचे विविध कारणांनी निधन झाले. सातत्याने संकटांची मालिका सुरूच आहे. असे अनेक आघात सहन करत महुद येथील सिद्धी लहू कांबळे हिने आपले शिक्षण जिद्दीने सुरू ठेवत विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या एकलव्य पुरस्काराने तिला नुकतेच सातारा येथे सन्मानित करण्यात आले.
सिद्धी ही रयतच्या दूरस्थ गुरुकुलची विद्यार्थिनी आहे. सांगोला तालुक्यातील महूद हे तिचे जन्मगाव. गावातील श्री शिवाजी विद्यालयात तिचे माध्यमिक शिक्षण झाले. हुशारीबरोबर नम्रता, समंजसपणा, आज्ञाधारकता, जिद्दी, मेहनती, शिस्तप्रिय विद्यार्थिनीस संस्थेने हा पुरस्कार देऊन योग्य अशी निवड केलेली आहे. या पुरस्कारांतर्गत रोख रक्कम पंचवीस हजार रुपये देऊन तिला सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरणप्रसंगी संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, सहसचिव बी. एन. पवार, मध्य विभागाचे विभागीय चेअरमन संजीव पाटील, माजी सचिव, सर्व सदस्य, विभागीय अधिकारी जगदाळे, सहाय्यक विभागीय अधिकारी एन. टी. निकम, दिनेश दाभाडे, सिद्धी कांबळे हिचे पालक उपस्थित होते.
गरीब, मागासवर्गीय कुटुंबात जन्म
सिद्धी कांबळे हिच्या जन्मापासूनच अनेक संकटांची मालिका सुरु आहे. नऊ सदस्यांच्या एकत्रित कुटुंबात आजोबांचे पाचवी शिक्षण, आजी निरक्षर, आईचे शिक्षण इयत्ता तिसरी, तर वडील इयत्ता दहावी नापास अशा अतिशय कमी शिकलेल्या अतिशय गरीब, मागासवर्गीय कुटुंबामध्ये या विद्यार्थिनीचा जन्म झाला आहे.
एकाच खोलीमध्ये स्वयंपाक करताना स्वयंपाक घर, पाहुणे आल्यानंतर बैठक खोली, रात्री झोपण्याची वेळ झाली की बेडरूम अशा एकाच खोलीत तिचा अभ्यास सुरू असे. दरम्यानच्या काळात चुलता आणि छोट्या भावाचे अपघाती निधन झाले आणि वडिलांचे आजारपण अशा संकटांची मालिका सुरू असतानाच इयत्ता आठवीमध्ये एनएमएमएस या परीक्षेत यश मिळवून ती शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली. ही विद्यार्थिनी इयत्ता नववीत असताना फुफ्फुसाच्या आजाराने तिच्या वडिलांचे निधन झाले. तरीही न खचता तिचा अभ्यास नियमित सुरू होता. अशा होतकरू व गरीब विद्यार्थिनीस महुदच्या श्री शिवाजी विद्यालयाच्या सर्वच रयत सेवकांचे विशेष मार्गदर्शन लाभत गेले.
दहावीला केंद्रात द्वितीय क्रमांक
तिची शिकण्याची जिद्द आणि चिकाटी याचेच यश म्हणून मार्च २०२३ च्या दहावीच्या परीक्षेत सिद्धी कांबळे हिने ९७.२० टक्के गुण मिळवत विद्यालयात व महूद केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला. ती इयत्ता अकरावीमध्ये असताना पानटपरी चालवून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या तिच्या आजोबांचेही वृद्धापकाळाने निधन झाले. आता सध्या कुटुंबामध्ये ही स्वतः मुलगी, आई, आजी, लहान बहीण व एक लहान भाऊ यांच्या समवेत राहत आहे. अशा या होतकरू विद्यार्थिनीस ओळखून रयत शिक्षण संस्थेने तिला एकलव्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.
पुढील शिक्षणासाठी अनेकांचे सहकार्य
इयत्ता दहावीनंतर पुढील वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सध्या ती लातूर येथे अभ्यास करत आहे. या विद्यार्थिनीस तिथे प्रवेश मिळवून देण्यासाठी श्री शिवाजी विद्यालयातील शिक्षक व काही पालकांनी विशेष प्रयत्न करत तिच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर केला आहे. सिद्धी कांबळे हिची लातूर येथील राहण्याची व जेवणाची सोय करण्याकरिता विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवंत लवटे, विठ्ठल बंडगर, विश्वास लवटे, विठ्ठल बागल, अमोल यलमार यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे. एकलव्य पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य उत्तम रायभान, संस्थेचे आजीव सदस्य कृष्णा रेडे, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ यांनी तिचे कौतुक करून पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या