मुसळधार पावसाने झाली दलदल; खांद्यावर दुचाकी निघाला पैदल
Satara News : प्रचंड मोठे शिवलिंग खांद्यावर तोलून चाललेला अचाट शक्तीचा बाहुबली आपण चित्रपटात पाहिला असेल, मात्र खेळण्यातली एखादी गाडी उचलावी त्याप्रमाणे आपली मोटरसायकल खांद्यावर घेऊन दलदल तुडवत निघालेला खराखुरा बाहुबली रविवारी सातारा जिल्हावासीयांनी पाहिला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
गेले पाच-सहा दिवस जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. दुष्काळी फलटण तालुक्यात तर ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला आहे. माण तसेच खटाव तालुक्यातही त्या खालोखाल परिस्थिती आहे. तीन दिवसातील अति मुसळधार पावसामुळे या तालुक्यांमध्ये कित्येक रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. खड्डे, चिखल, दलदल, राडारोडा असे दयनीय चित्र सध्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग अनुभवतो आहे.
बिघडेल म्हणून घेतली खांद्यावर
माण तालुक्यातील कुळकजाई या छोट्याशा गावात रविवारी मात्र जरा आक्रितच पाहायला मिळाले. या गावातील विनय घोरपडे हा तरुण मोटरसायकलवरून कुठेतरी निघाला होता. मात्र रस्त्यातील गुडघाभर चिखलातून मोटरसायकल कशी घालावी असा त्याला प्रश्न पडला. चिखलात गाडी अडकली तर सुरू व्हायची नाही आणि बिघडेल असे त्याला वाटले. म्हणून त्याने चक्क आपली मोटरसायकल उचलून खांद्यावर घेतली. गाडीची सीट खांद्यावर आणि चाके वर अशा स्थितीत तो चिखल तुडवत वाट काढत पुढे निघाला. चिखल, खड्डे आणि रस्त्यातून वाहणारे पाणी यातून तो अगदी बिनधास्तपणे चालला होता. पाण्याचा प्रवाह ओलांडून पुढे जाताना, पुढच्या कटणावर जाऊ दे असे कोणीतरी त्याला म्हणाले. त्याप्रमाणे पुढे जाऊन उंच ठिकाणी त्याने ती मोटरसायकल खाली उतरवली.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल
या गावरान बाहुबलीचा हा पराक्रम कोणीतरी शूट केला. हा व्हिडिओ आज दिवसभर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर असंख्य प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणी त्याच्या अचाट ताकदीला दाद दिली आहे, तर कोणी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या अवस्थेवर आसूड ओढले आहेत. दोन पावसात रस्त्यांची अशी दाणादाण उडत असेल तर कामाचा दर्जा काय होता असेही प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या