९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वैभवशाली होईल
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची चौथी राजधानी राहिलेल्या सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे साहित्य संमेलन राजधानीच्या इतिहासाला आणि वैभवाला साजेसेच भव्यदिव्य आणि देखणे होईल प्रत्येक साहित्यप्रेमीच्या मनात दुर्दम्य विश्वास आहे. या संमेलनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील साहित्य चळवळ व त्यातील गुंफण अकादमीच्या योगदानाचा मागोवा...
- डॉ. बसवेश्वर चेणगे
9850659708
सातारा जिल्ह्याला जसा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राचा वारसा लाभलेला आहे, तसाच साहित्य क्षेत्राचाही फार मोठा वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यामध्ये कवी बा. सी. मर्ढेकर यांच्यापासून कवी यशवंत यांच्यापर्यंत अनेक दिग्गज साहित्यिक होऊन गेलेले आहेत. साताऱ्यातील या परंपरांचा विचार करताना आपल्याला औंध या संस्थानात देखील साहित्याला एक मोठे महत्त्व होते असे लक्षात येते. औंधच्या राजांनी सुद्धा साहित्य लेखन केले होते असे संदर्भ आपल्याला सापडतात. म्हणून सातारा येथे होणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अधिक दिमाखदार व सर्वसमावेशक व्हावे अशी येथील प्रत्येक साहित्यिक, साहित्यप्रेमी व वाचक यांची मनोमन इच्छा आहे.
सातारा येथे हे साहित्य संमेलन होण्यासाठी पत्रकार मित्र व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी तसेच ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ सर यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी साहित्य संमेलन सातारा येथे होण्यासाठी केलेली विनंती व या विनंतीला साहित्य महामंडळाकडून मिळालेला प्रतिसाद तसेच या प्रयत्नांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले त्यांचा मिळालेला भक्कम पाठिंबा महत्वपूर्ण ठरला आहे.
विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा त्याचप्रमाणे मावळा प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने होत असलेले हे साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठिंब्यामुळे अतिशय देखणे होईल यात शंका नाही.
६६ व्या संमेलनात पुस्तक प्रकाशन
सातारा जिल्ह्यामध्ये आजवर पाच साहित्य संमेलने झाली आहेत. त्यामध्ये सातारा शहरात तीन साहित्य संमेलने पार पडली आहेत. १९०५ साली सातारा येथे तिसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. या संमेलनाचे अध्यक्ष रघुनाथ करंदीकर हे होते. त्यानंतर १९६२ मध्ये सातारा येथे ४४ वे साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष काकासाहेब गाडगीळ हे होते. १९७५ साली कराड येथे ५१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्याच्या अध्यक्ष दुर्गा भागवत ह्या होत्या. १९९३ मध्ये ६६ वे साहित्य संमेलन विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे पार पडले होते. या साहित्य संमेलनात मी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी माननीय अभयसिंहराजे भोसले हे उपस्थित होते याची आठवण आजही माझ्या मनात मी जपून ठेवली आहे.
यानंतर सन २००९ मध्ये ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे पार पडले. यानंतर आता सन २०२५ मध्ये म्हणजे जवळपास ३२ वर्षांनी सातारा जिल्ह्याला साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळत आहे याचा जिल्ह्यातील प्रत्येक साहित्य प्रेमीला मनस्वी आनंद आहे.
मराठी माणूस तिथे गुंफण
सातारा जिल्ह्यातील अनेक साहित्य संस्था आपापल्या परीने साहित्य जागर चालू ठेवण्याचे काम सातत्याने करीत आहेत. यामधीलच एक संस्था म्हणजे आमची मसूर (ता. कराड) येथील गुंफण अकादमी. गुंफण अकादमीने मराठी साहित्य विश्वात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये एक वेगळे नाव मिळवले आहे. जिथे मराठी माणूस तिथे गुंफण हे ब्रीद घेऊन साहित्याची पताका सर्वदूर पोहोचवण्याचे काम कोणत्याही शासकीय मदतीशिवाय या संस्थेने केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यामध्ये होत असताना या संस्थेने साहित्यासाठी दिलेले योगदानाची माहिती किंवा नोंद सर्वदूर होणे गरजेचे आहे. कारण मराठी साहित्य विश्वातील मोठे साहित्यिक महाराष्ट्र, कर्नाटकातील सीमा भाग व गोव्यातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या संस्थेने प्रामाणिकपणे व निष्ठेने केले आहे. कर्नाटकातील सीमा भागात मणतुर्गे, जांबोटी, कावळेवाडी ईदलहोंड, खानापूर अशा अनेक ठिकाणी साहित्य संमेलनांचे आयोजन करून मराठी अस्मिता जतन करण्याचे काम केले आहे. डॉ. श्रीपाल सबनीस, महेंद्र कदम, रंगनाथ पठारे, डॉ. विश्वास मेहेंदळे, बबन पोतदार, न्यायमूर्ती सुनील वेदपाठक असे अनेक साहित्यिक या साहित्यिक संमेलनांना उपस्थित होते.
दिग्गज साहित्यिकांची उपस्थिती
आजवर गुंफणच्या साहित्य संमेलनाला आनंद यादव, उत्तम कांबळे, कवी ग्रेस, द. मा. मिरासदार, कवी विठ्ठल वाघ, कवी फ. मुं. शिंदे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी, आशा काळे, निळू फुले यांची उपस्थिती राहिली आहे. यासोबतच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सध्याचे केरळचे राज्यपाल महामहिम राजेंद्रजी आर्लेकर, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व माजी केंद्रीय कायदामंत्री माननीय रमाकांत खलप, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले तसेच सिक्कीमचे माजी राज्यपाल महामहीम श्रीनिवासजी पाटील, बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील या मान्यवरांचे आशीर्वाद व मार्गदर्शन संस्थेला लाभले आहे. त्यामुळेच आम्ही आजवरचा साहित्य प्रवास करू शकलो आहे. बिहारचे माजी राज्यपाल महामहीम राजेंद्रजी आर्लेकर यांच्यामुळे आमच्या संस्थेने पटना येथे पहिले आंतरराज्य बहुभाषिक कवी संमेलन आयोजित केले होते. जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे नवोदिकांना सहभागी करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम गुंफणने केले आहे. मराठी भाषेसाठी झटणारे सीमा भागातील धडाडीचे कार्यकर्ते गोव्यातील कवयित्री चित्रा क्षीरसागर, गुणवंत पाटील, गजानन चेणगे, विकास धुळेकर, अंकुश पवार, सौ. स्वाती बाजारे यांचे या कार्यात नेहमीच पाठबळ मिळत राहिले आहे.
गेली वीस वर्षे अखंडपणे आम्ही या संस्थेच्या माध्यमातून माजी खासदार प्रेमलाताई चव्हाण राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धा आयोजित करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नवोदित विनोदी कथा लेखक तयार होऊ लागले आहेत ही या संस्थेच्या कामाची खरीखुरी पोहोच आहे.
सीमा भागात मराठीसाठी योगदान
ज्यावेळी आम्ही कर्नाटकाच्या सीमा भागामध्ये साहित्य संमेलन घेतो त्यावेळी तेथील लोकांचा उत्साह वाखण्यासारखा असतो. तेथील रस्त्यारस्त्यांवर सडा रांगोळी, मराठी विषयी घोषवाक्य लिहून महिला ग्रंथ दिंडीमध्ये डोक्यावर पाण्याचा कलश, तुळशी वृंदावन घेऊन सहभागी होतात. या ग्रंथ दिंडीमध्ये भजन तसेच अभंग यांचे गायन होत असते. ठिकठिकाणी सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भातील घोषवाक्य लिहिलेले फलक घेऊन विद्यार्थी या ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी झालेले असतात. संमेलनात सहभागी लेखकांची पुस्तके ग्रंथ दिंडीमध्ये पालखीत ठेवली जातात. ती पुस्तके व संस्थेकडे जमा असलेली काही पुस्तके एकत्र करून साहित्य संमेलन ज्या गावात संपन्न होते त्या गावात संमेलनाची आठवण म्हणून ग्रंथालय उभारले जाते. त्यासाठी ती पुस्तके दान केली जातात.
वाशीचे संस्मरणीय साहित्य संमेलन
दोन वर्षांपूर्वी गुंफण अकादमीने कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी भव्य दिव्य असे दोन दिवसाचे साहित्य संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाच्या नियोजनामध्ये आमचे मित्र व वाशी येथील सामाजिक कार्यकर्ते, लेखक बी. ए. उर्फ भीमराव पाटील यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा खूप मोलाचा वाटा होता. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र माने होते. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांचीही उपस्थिती या संमेलनाला लाभली होती. संमेलनाच्या पूर्वसंध्येला आयोजित लोकजागर कार्यक्रमात शाहिरी कला, भेदिक शाहिरी, डफ, धनगरी ओव्या अशा विविध लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले होते. गुंफण अकादमीच्या साहित्य संमेलनांच्या इतिहासात नोंद घ्यावी असे साहित्य संमेलन पार पडले.
गुंफणच्या आजवरच्या साहित्य संमेलनात विविध विषयावरील परिसंवाद, कवी संमेलने, प्रकट मुलाखती अशा प्रकारे बहारदार साहित्य संमेलने संपन्न झाली आहेत. गुंफण अकादमीच्या साहित्य चळवळीस आमच्या मसूर गावचे लेखक, ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांनी आजवर समर्थपणे साथ दिली आहे. त्यांचे या साहित्य चळवळीतील योगदान मोलाचे आहे. सातारा येथे साहित्य संमेलन होत असताना अशा व्यक्तीचा सन्मान होणेही गरजेचे आहे. सातारा जिल्ह्याचा अभिमान म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे आमचे मित्र, चित्रपट कथा लेखक प्रताप गंगावणे यांचेही साहित्य क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. गुंफणच्या साहित्य चळवळीमध्ये त्यांचाही मोलाचा वाटा आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची खरी खरी प्रतिभा समाजासमोर आणली आहे. त्यामुळे गुंफण अकादमीच्या साहित्य संमेलनामधून त्यांची प्रकट मुलाखत घेऊन छत्रपती संभाजी राजांची प्रतिमा समाजासमोर अधिक उलगडून दाखवण्याचाही प्रयत्न आम्ही केला आहे. युवा पिढीला बरोबर घेऊन कवी संमेलन, साहित्य संमेलन कार्यशाळा यांचे आयोजन वेळोवेळी केलेले आहे. नवोदितांना संधी देण्याचे काम केले आहे.
साहित्य चळवळीत अनमोल योगदान
मराठी भाषा भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून मराठी भाषेचे जतन संवर्धन करण्याचे काम तसेच वाचक चळवळ बळकट करणे, ग्रंथालय चळवळ बळकट करणे अशा स्वरूपाचे काम संस्थेने आजवर केले आहे. तसेच समाजातील अनेक व्यक्तींना साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवणाऱ्या व्यक्तींना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एकूणच समृद्ध अशा समाजाच्या जडणघडणीमध्ये गुंफण अकादमीने सातत्याने प्रयत्नशील राहून काम केले आहे. त्यामुळे गुंफण अकादमीच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची नोंद घ्यावीच लागेल. अखिल भारतीय साहित्य संमेलन सातारा येथे होत असताना सातारा जिल्ह्याच्या साहित्य विश्वातील गुंफणचे साहित्य विषयक काम निश्चितच विसरता येणार नाही.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या