Satara News : अल निनोच्या सावटात वरूणराजाची कृपा, सातारा जिल्ह्यात सरासरीच्या १०३.४ टक्के पाऊस; ८६.३६ टक्के पाणीसाठा


सातारा जिल्ह्यात सरासरीच्या १०३.४ टक्के पाऊस; ८६.३६ टक्के पाणीसाठा

Satara News : गेले काही दिवस सातारा जिल्ह्यात विशेषतः जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या धुवाधार पावसाचा जोर आज काहीअंशी कमी झाला. अल निनोमुळे यावेळी पावसाबाबत साशंकता असताना जून - जुलै या मान्सूनच्या पूर्वार्धात जिल्ह्यात सरासरीच्या १०३.४ टक्के पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरण प्रकल्पांमध्ये एकूण क्षमतेच्या ८६.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

दरम्यान, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांपर्यंत उचलण्यात आले असून धरणातून ३३ हजार ८२६ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जुलैमध्ये तूट भरून निघाली

पावसाळ्याच्या सुरुवातीची मृग आणि आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेल्यामुळे यंदा लोकांची चिंता वाढली होती. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आणि जुलैमधील तुफान पर्जन्यवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यात जूनमधील तूट भरून निघाली. त्यामुळे जून - जुलैअखेर सरासरीच्या १०३.४ टक्के पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयनेसह धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी यासह सर्वच धरण प्रकल्पांमध्ये मिळून तब्बल ८६.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

कोयनेचे दरवाजे सहा फुटांवर

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या धुवाधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या या धरणामध्ये आजअखेर ९०.५७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्याच्या दृष्टीने धरणाचे सहा वक्र दरवाजे कालपासून टप्प्याटप्प्याने सहा फुटापर्यंत उचलण्यात आले असून त्याद्वारे ३२ हजार ७७६ व धरण पायथा विद्युत गृहातून १०५० असा मिळून एकूण प्रतिसेकंद ३३ हजार ८२६ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. 

कोयनेतील विसर्गाप्रमाणेच धोम, कण्हेर, उरमोडी आदी प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे कृष्णामाईच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून पुराच्या भीतीने नदीकाठच्या गावकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या