Satara News : वर्णे ते सातारा शेतकऱ्यांचा लॉंग मार्च, निगडीच्या जाहीर सभेत एमआयडीसीविरोधात एल्गार


निगडीच्या जाहीर सभेत एमआयडीसीविरोधात एल्गार

Satara News : सातारा तालुक्यातील वर्णे, देवकरवाडी, निगडी आणि राजेवाडी या चार गावांवर प्रस्तावित एमआयडीसी लादण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात आता संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार बाधित शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. निगडी येथे झालेल्या जाहीर सभेत याप्रश्नी हजारो शेतकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत 'वर्णे ते सातारा लॉंग मार्च' काढण्याची घोषणा करत आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याचा एल्गार करण्यात आला.

बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या सुपीक जमिनींवर एमआयडीसी लादण्याचा हा निर्णय अन्यायकारक असून तो कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने दिली, वारंवार मागण्या मांडल्या; मात्र प्रशासनाने केवळ वेळकाढूपणा केला. त्यामुळे आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असे ठणकावून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व वर्णे गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी याप्रसंगी शासन व प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.

ही शेतकरी क्रांतीची सुरुवात

आजची अभूतपूर्व गर्दी ही केवळ सभा नसून शेतकरी क्रांतीची सुरुवात आहे. वर्णे ते सातारा लॉंग मार्च काढून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या अन्यायाकडे वेधले जाईल असे सांगून ते म्हणाले, लोकप्रतिनिधींनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी. शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार की शासनाच्या अन्यायाच्या बाजूने, हे जनतेला कळले पाहिजे. अन्यथा देगावप्रमाणे न्यायालयीन लढाही उभारला जाईल आणि लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.

सार्वजनिक निधीचा अपव्यय

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सचिव प्रवीण धस्के यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका बाजूला याच परिसराच्या सिंचनासाठी जिहे-कठापूर योजनेतून सुमारे २१०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करायचा, जलयुक्त शिवार अभियानातून कोट्यवधी रुपयांची जलसंधारणाची कामे करायची आणि दुसऱ्या बाजूला तीच सुपीक जमीन एमआयडीसीसाठी संपादित करायची, हा शासनाच्या नियोजनातील मोठा विरोधाभास असून हा सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे, असे ते म्हणाले. शासनाने अधिसूचनेवर हरकती दाखल करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांना न्याय्य संधी देण्याची मागणीही त्यांनी केली.

सभेत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोहर येवले, आजी-माजी सैनिक संघटनेचे प्रतिनिधी तसेच बाधित शेतकऱ्यांनीही शासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

या जाहीर सभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अर्जुनराव साळुंखे, तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, संघटनेचे पदाधिकारी, चारही गावांतील बाधित शेतकरी, महिला, युवक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन युवा निवेदक सुजित काळंगे यांनी केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या