महाराष्ट्रासह सहा राज्यांचा समावेश; शासनाने इच्छाशक्ती दाखवावी
Western Ghat News : केंद्र सरकारने पश्चिम घाटातील ५६ हजार ८२५.७ चौरस किलोमीटर क्षेत्राला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी सातवा मसुदा अधिसूचना जारी केली आहे. या क्षेत्रामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या सहा राज्यांचा समावेश आहे. दरम्यान, संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करताना या क्षेत्रात पर्यावरण संरक्षणाला आत्यंतिक महत्त्व मिळणे अभिप्रेत असून त्यासाठी मानवी हस्तक्षेपांवर नियंत्रण राहील याची इच्छाशक्ती शासनाने कृतीतून दाखवावी अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.
पश्चिम घाट हिंदुस्थानी द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्यालगत सुमारे १ हजार ६०० किलोमीटर लांबीपर्यंत पसरलेला पर्वतरांगांचा पट्टा आहे. हा जागतिक ३६ जैवविविधता हॉटस्पॉट्सपैकी एक असून, देशातील चार प्रमुख जैवविविधता हॉटस्पॉट्समध्ये त्याचा समावेश होतो. हिमालय, इंडो-बर्मा प्रदेश आणि सुंदालँड हे अन्य तीन हॉटस्पॉट्स आहेत.
पश्चिम घाट हा हिमालयापेक्षाही अधिक प्राचीन पर्वतरांगांचा भाग आहे. युनेस्कोने २०१८ मध्ये पश्चिम घाटाला जगातील महत्त्वपूर्ण जैवविविधता वारसा स्थळांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे. पश्चिम घाट (सह्याद्री) हा देशातील तसेच जगातील सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक संपदांपैकी एक मानला जातो. या प्रदेशात अत्यंत समृद्ध जैवविविधता, स्थानिक वनस्पती व प्राणी आढळतात.
दक्षिण हिंदुस्थानचा जलसाठा
दक्षिण-पश्चिम मान्सूनला अडवून हा प्रदेश दक्षिण हिंदुस्थानच्या हवामानाचे नियमन करतो. येथील दाट अरण्ये आणि नद्यांवर कोट्यवधी लोकांचे पाणी व उपजीविका अवलंबून आहे. येथे उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले, गवताळ प्रदेश, मायरिस्टिका दलदली आणि शोला वन अशी विविध परिसंस्था आढळतात. सिंहशेपूट माकड, निलगिरी तहर, वाघ यांसारख्या अनेक संकटग्रस्त प्रजातींचे हे महत्त्वाचे अधिवास आहेत. कृष्णा, गोदावरी, कावेरी, मांडवी, पेरियार आणि शरावती यासारख्या प्रमुख नद्यांचा उगम पश्चिम घाटात होतो. त्यामुळे पश्चिम घाटाला 'दक्षिण हिंदुस्थानचा जलसाठा' असेही म्हटले जाते.
पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अर्थात ईएसए म्हणजे संरक्षित क्षेत्रांच्या आसपास निश्चित केलेला संवेदनशील संरक्षक पट्टा (बफर झोन) होय. या क्षेत्रामध्ये खाणकाम, मोठे जलविद्युत प्रकल्प, प्रदूषणकारी उद्योग यासारख्या मानवी हस्तक्षेपांवर नियंत्रण ठेवून पर्यावरणाचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे. गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांतील ईएसए सीमांबाबत मोठ्या प्रमाणावर सहमती झाली आहे. तामिळनाडू राज्यालाही या विषयावर विशेष आक्षेप नाहीत.
पश्चिम घाटासमोरील प्रमुख धोके
मोठी धरणे, रस्ते व रेल्वे प्रकल्पांमुळे अधिवासांचे तुकडीकरण होत असून जैवविविधतेवर परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे तापमानवाढ, पर्जन्यमानातील बदल आणि अधिवासांमध्ये बदल होत आहेत. वाढत्या पर्यटनामुळे कचरा, वन्यजीवांना होणारा त्रास आणि मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. युकॅलिप्टस व ॲकेशिया यांसारख्या परदेशी वनस्पती स्थानिक वनस्पतींची जागा घेत असल्याने जैवविविधतेत घट होत आहे. शेती, मळे, वृक्षतोड, अतिक्रमण आणि कचरा टाकण्यामुळे नैसर्गिक अधिवासांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
प्रतिबंधित
खाणकाम
प्रदूषणकारी उद्योग
मोठे जलविद्युत प्रकल्प
धोकादायक रसायने व पदार्थांचा वापर
कचरा व घातक अवशेषांची विल्हेवाट
नियमनाखाली
वृक्षतोड
हॉटेल व पर्यटन प्रकल्प
रस्त्यांचे रुंदीकरण
भूजलाचा वापर
व्याघ्र प्रकल्प व जंगलातील रात्रीची वाहतूक
परदेशी प्रजातींची लागवड किंवा प्रवेश
परवानगी असलेले
पारंपरिक शेती व फळबागा
पावसाच्या पाण्याचे संधारण
सेंद्रिय शेती
अक्षय ऊर्जा प्रकल्प
पर्यावरणपूरक व हरित तंत्रज्ञानाचा वापर
अधिसूचना अत्यंत वेळेवर आणि आवश्यक !संवर्धनाच्या दृष्टीकोनातून पाहता, पश्चिम घाटाला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी जारी करण्यात आलेली ही अधिसूचना अत्यंत वेळेवर आणि आवश्यक आहे. पश्चिम घाट हा दक्षिण भारतातील प्रमुख नद्यांचा उगमस्थान असून हजारो स्थानिक (एन्डेमिक) वनस्पती व प्राणी प्रजातींचे आश्रयस्थान आहे. तसेच, हा प्रदेश हवामानाचे संतुलन राखण्यात, पर्जन्यमानावर प्रभाव टाकण्यात आणि जलसुरक्षा सुनिश्चित करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अधिसूचना विशेष महत्त्वाची आहे, कारण यामध्ये इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया, सह्याद्री टायगर रिझर्व, कोयना वर्ल्ड सेंचुरी, चांदोली नॅशनल पार्क, राधानगरी वाईल्ड लाईफ सेंचुरी, भीमाशंकर वाढल्यास सेंचुरी यासारख्या पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या प्रदेशांचा समावेश आहे. याशिवाय, वाघ, बिबट्या, गवा आणि इतर वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी अत्यावश्यक असलेल्या वन्यजीव मार्गिका (वाईल्डलाइफ कॉरिडोर्स) यांनाही या अधिसूचनेमुळे संरक्षण मिळणार आहे.- रोहन भाटे,मानद वन्यजीव रक्षक
Ecologically Sensitive Area, Sahyadri Tiger Reserve, Koyna Wildlife Sanctuary, Chandoli National Park, Radhanagari Wildlife Sanctuary, Bhi mashankar Wildlife Sanctuary
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या