Human Interest Story : हसणारी माणसं, रुसणारी माणसं


माणसांचे विविध 'रंग' : कुणी पडलेल्याला हात देतं, तर कुणी पडायची वाट पाहतं !

माणसं वाचणं हे जगातलं कदाचित सर्वांत कठीण काम असावं. पुस्तक वाचताना अक्षरांचा अर्थ समजतो; चेहरा पाहताना भाव दिसतात; पण माणसाच्या मनात नेमकं काय दडलं आहे, हे समजून घेण्यासाठी मात्र केवळ डोळे पुरत नाहीत. त्यासाठी संवेदनशील मन लागतं.

- डॉ. बसवेश्वर चेणगे 

रक्ताचं नातं जवळचं असतं, पण प्रत्येक रक्ताचं नातं मनाचं नातं असेलच असं नाही. काही माणसं अगदी जवळची असूनही मनाने दूर असतात. त्यांच्याशी बोलताना शब्द असतात; पण जिव्हाळा नसतो. उलट काही माणसं रक्ताच्या नात्यातली नसतात, तरी त्यांच्या एका शब्दाने मनाला आधार मिळतो. ते सुखात आनंदी होतात, दुःखात खांद्याला खांदा लावून उभे राहतात. म्हणूनच नाती केवळ रक्ताने निर्माण होत नाहीत; ती विश्वासाने, आपुलकीने आणि माणुसकीने घट्ट होत असतात.

काही माणसं अशी असतात की आपल्या आवाजातील बदल त्यांना जाणवतो. “काय झालं?” एवढा एक प्रश्न ते विचारतात आणि मनात साठवलेलं दुःख डोळ्यांतून ओघळायला लागतं. काहींना चेहरा वाचता येतो. आपण “मी ठीक आहे” असं म्हटलं तरी त्यांना आपल्या मनातली अस्वस्थता जाणवते. अशी माणसं आयुष्यात असणं ही मोठी श्रीमंती असते.

काही माणसं भेटली की भरभरून बोलतात. जणू आपण कित्येक वर्षांनी भेटलो आहोत, अशा उत्साहाने आपली चौकशी करतात. त्यांच्या बोलण्यात आपलेपणाचा ओलावा असतो. पण गरजेच्या वेळी आपण त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा ठेवली की काही ना काही कारण पुढे येतं. तेव्हा लक्षात येतं—काही माणसांचं आपलेपण शब्दांपुरतंच असतं.

काही माणसं आपल्या भोवती वावरतात, आपली सुख-दुःखं जाणून घेतात; पण ती दुसरीकडे सांगण्यात त्यांना विशेष आनंद मिळतो. आपली एखादी अडचण त्यांच्या हातात जणू चर्चेचा विषय बनते. अशा माणसांपासून सावध राहणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक जवळ येणारा माणूस आपला असतोच असं नाही.

कधी कधी आपण एखाद्याला मनापासून आपलं मानतो; पण त्याच्या वागण्यातून वारंवार प्रश्न पडतो—“खरंच हा माणूस आपला आहे का?” जवळ असूनही परकेपणाची जाणीव करून देणारी माणसंही आपल्या आयुष्यात असतात. त्यांचं मन कधी उघडत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात काय आहे याचा अंदाज येत नाही.

याउलट काही माणसं मनाने इतकी मोकळी असतात की भेटताच मनातलं सगळं भडाभडा सांगून टाकतात. कधी हसतात, कधी रडतात, कधी रुसतात, कधी भांडतात; पण मनात कपट ठेवत नाहीत. त्यांचा रुसवा देखील प्रेमाचा असतो. ते आपल्यावर हक्क गाजवतात, कारण आपण त्यांना आपले वाटतो. म्हणूनच काही भांडणं नातं तोडत नाहीत; उलट नात्याची खोली सांगून जातात.

माणसांच्या स्वभावात आणखीही अनेक रंग असतात. कुणी कौतुक करण्यात उदार असतं, तर कुणाला दुसऱ्याचं यश पाहवत नाही. कुणी पडलेल्या माणसाला हात देतं, तर कुणी त्याच्या पडण्याची वाट पाहत असतं. कुणी दुसऱ्याच्या आनंदात मनापासून टाळी वाजवतं, तर कुणी हसतमुखाने अभिनंदन करत असतानाच मनात तुलना करत असतं.

तरीही या सगळ्या माणसांना आपण आयुष्यातून पूर्णपणे वजा करू शकत नाही. कारण प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवून जातो. चांगली माणसं आपल्याला प्रेम शिकवतात; काही सावध राहायला शिकवतात; रुसणारी माणसं नात्यांची किंमत सांगतात; तर कपटी माणसं विश्वास कुणावर ठेवायचा, याचा धडा देतात.

शेवटी हसणारी, रुसणारी, भांडणारी, कुरघोड्या करणारी, कधी आपल्याशी राजकारण करणारी—ही सगळी आपलीच माणसं असतात. त्यांच्यामुळेच जीवनाला रंग येतात. अगदी सरळ रेषेसारखं जीवन कदाचित सुंदरही वाटणार नाही.

माणसाला माणूस म्हणून समजून घेणं, त्याच्या चुका स्वीकारणं आणि शक्य तिथे मन जपणं हेच खरं माणूसपण आहे. कारण शेवटी संपत्ती, पद, प्रतिष्ठा सगळं मागे राहतं; आठवणीत राहतात ती माणसं... ज्यांनी कधी आपल्याला मनापासून हसवलं, कधी रुसवलं, कधी रडवलं आणि कधी न बोलताही आपल्याला समजून घेतलं.

बहुतांची अंतरे समजून घेण्याचा प्रयत्न केला, की जाणवतं... माणूस हा एकच चेहरा नसतो. त्याच्यात अनेक चेहरे, अनेक भावना आणि अनेक गुपितं दडलेली असतात. म्हणूनच माणसं समजून घेण्यापेक्षा त्यांना थोडं जपून घेणं अधिक महत्त्वाचं असतं.

बहिणाबाई चौधरींनी माणसाच्या स्वभावातील याच गूढतेला आपल्या सहज, ग्रामीण आणि थेट भाषेत स्पर्श केला आहे. त्यांच्या ‘माणूस’ या कवितेतील प्रश्न आजही मनाला अस्वस्थ करतो...

“मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!”

माणूस कितीही मोठा झाला, तरी त्याच्या अंतःकरणातली माणुसकी जिवंत राहिली तरच त्याच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. शेवटी प्रश्न एवढाच, आपण माणसांसोबत किती जगलो, हा नाही; तर आपण किती माणूस म्हणून जगलो?

बहिणाबाईंच्या ‘माणूस’ या कवितेचा आशय माणसाच्या स्वार्थी वृत्तीवर आणि हरवत चाललेल्या माणुसकीवर नेमका प्रहार करणारा आहे; “मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!” ही तिची मध्यवर्ती हाक आहे!

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या