Satara Story : सातारकरांच्या अंगावर आला काटा


सातारा शहरात पार्किंग 'जवापाडे'; पण वाहनांचे माप 'पर्वताएवढे'

सातारा शहरात पार्किंगची व्यवस्था 'जवापाडे', पण वाढत चाललेल्या वाहनांचे माप 'पर्वताएवढे' अशी अवस्था असल्यामुळे गणेशोत्सवात शहरातील संभाव्य वाहतूक कोंडीच्या कल्पनेनेच नागरिकांच्या अंगावर काटा आला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या बाबतीत नगरपालिका उदासीन, तर पोलीस यंत्रणा आहे त्यातच भागवाभागवी करण्यात धन्यता मानत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप अटळ आहे. 

- गजानन चेणगे

शहर व परिसरात असलेल्या वेगवेगळ्या वाहनांच्या शोरूममधून दुचाकी, तीन चाकी, चार चाकी अशा विविध वाहनांची विक्री अव्याहतपणे होत आहे. त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसागणिक प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मात्र शहरात पार्किंगची व्यवस्था त्या प्रमाणात वाढलेली नाही. पार्किंगची व्यवस्था न केलेल्या किंवा करूनही त्यामध्ये पुन्हा बंदिस्त करून त्याचा व्यावसायिक वापर करणाऱ्या अनेक इमारती शहरात उभ्या आहेत. वर्षानुवर्षे वादंग होऊनही त्यावर ठोस कारवाई झालेली नाही. नवीन होणाऱ्या इमारतींच्या बाबतीत याचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. या अनागोंदी कारभारामुळे शहरात पार्किंग समस्येचा बट्ट्याबोळ झाला आहे. 

शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलीस यंत्रणेनेही पुढे येऊन मार्ग काढला पाहिजे. पण त्यांच्याकडूनही याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. शहरात सम विषम पार्किंग असले तरी ज्या बाजूला पार्किंग असते त्या बाजुचे व्यावसायिक दुकानासमोर लोखंडी जाळ्या टाकतात. राहिलेल्या जागेत किरकोळ व्यावसायिक त्यांचे व्यवसाय मांडतात. त्यामुळे लोकांना त्यांची वाहने लावायला जागाच उरत नाही. इतर ठिकाणी वाहने लावली तर वाहतूक शाखेच्या क्रेन कधी टपकतील याचा नेम नाही. त्यामुळे बिचाऱ्या वाहनधारकाचा निम्मा जीव कामाकडे आणि निम्मा गाडीकडे असे होते. क्रेनने गाडी उचलली तर होणारा मनस्ताप आणि खिशाला बसणारी चाट दोन्हीही परवडणारे नसते. 

वाहनधारकांना पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यापेक्षा त्यांच्याकडून वसुली करण्याला महत्त्व आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सामान्य नागरिक अशा चक्रव्यूहात सापडला आहे. त्यामुळेच आता गणेशोत्सवात शहरातील संभाव्य वाहतूक कोंडीच्या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर काटा आला आहे. 

आहे त्यातच भागवाभागवीचा प्रकार 

या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सातारा पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच वाहतूकीची कोंडी होऊ नये, अपघात घडू नये अथवा कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दि. १४ रोजी सकाळी १० पासून दि. २५ रोजी रात्री १० पर्यंत सातारा शहरातील अंतर्गत वाहतुक व्यवस्थापनात काही बदल केले आहेत. परंतु ही व्यवस्था म्हणजे आहे त्यातच भागवाभागवी करण्याचा प्रकार आहे. प्रचंड वाहन संख्येच्या प्रमाणात पार्किंगला जागा नाही ही एरवीही ओरड असते. त्यामुळे अशा उत्सव काळात ही व्यवस्था अपुरी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

या पार्श्वभूमीवर शहरातील पार्किंग समस्या आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी त्यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कठोर पावले उचलण्याची तयारी ठेवली तर हा प्रश्न सुटू शकेल. नगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांनी त्यासाठी समन्वय ठेवला पाहिजे अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे.

गणेशोत्सव काळातील बदल

सातारा शहरात वाहतुकीच्या रस्त्यावर गणेशोत्सव मंडळांचे मंडप ज्या बाजूला असतील, त्याच बाजुस दि. १४ ते २५ पर्यंत वाहने पार्किंग करावीत.

सातारा शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी सहा ते दहा या वेळेतच रस्त्यावर येण्यास परवानगी. अन्य वेळेत येणाऱ्या अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

राजपथ, शाहू चौक ते समर्थ मंदिर रोड, मोती चौक ते पोवई नाका रस्त्यालगत असणारी बेवारस वाहने / कायम रहिवासी नागरिकांची वाहने दि. १४ ते २५ पर्यंत रस्त्यावरुन काढुन पर्यायी पार्किंगमध्ये लावावीत.

सातारा शहरात खरेदीसाठी चारचाकी वाहन घेऊन येणाऱ्या नागरिकांनी आपले वाहन तालीम संघ तसेच राजवाडा येथील आळूचा खड्डा वाहनतळ येथे पार्किंग करावीत.

नगरपालिका प्रशासनाकडून अपेक्षा

  • आक्षेप असलेल्या जुन्या इमारतींमधील अतिक्रमणे काढणे
  • नवीन बांधकामे करताना नियमानुसार पार्किंगची व्यवस्था सक्तीने करवून घेणे
  • शहरात प्रमुख ठिकाणी प्राधान्यक्रमाने वाहनतळ उभारणे व ना नफा ना तोटा तत्वावर वाहनधारकांना ते उपलब्ध करून देणे

पोलीस यंत्रणेकडून अपेक्षा 

  • पार्किंगच्या बाजूला दुकानासमोर टाकल्या जाणाऱ्या जाळ्या काढाव्यात. त्याच बाजूला रस्त्यावर व्यवसाय थाटण्यास कडक निर्बंध घालावेत.
  • शहरातील नो एन्ट्रीत घुसणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करावी. (विशेषतः जुना मोटर स्टँड ते मोती चौक) 
  • गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी यासारख्या उत्सव काळात जुना मोटर स्टँड ते मोती चौक तसेच खण आळी हे रस्ते कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवावेत.

  • Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
  • आजच्या ताज्या बातम्या  

    पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

    आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

    बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या